Thursday, August 2, 2018


धरित्रीवरच्या स्वर्गाचे द्वार - गारजाईचे दार ...

यंदाच्या वर्षी वरुणराजाने सूर्यनारायणाला धरतीपर्यंत पोहोचू न देण्याचा जणू विडाच उचललेला दिसतोय. संपूर्ण आकाश काळ्या-पांढऱ्या ढगांनी झाकोळलेले आहे, पावसाच्या सरी धो-धो आणि अविरत बरसत आहेत. आम्हा भटक्यांसाठी हा पावसाळा म्हणजे एक निसर्गाचा विलुप्त असा आनंद अनुभवण्याची सुवर्णसंधीच जणू! या संधीचे पुरेपूर सोने करण्याचा निर्धार आम्ही सर्वांनी केलेला आहेच, त्याचाच एक भाग म्हणजे “ओझर्डे धबधबा आणि कोयना प्रकल्प” असा रग्गड प्लान आमच्या डॉक्टर साहेबांनी मागील रविवारी बोलून दाखवला आणि लगोलग इतर सारे कार्यक्रम बाजूला सारून त्यांना होकार सांगितला आणि रविवारची आतुरतेने वाट पाहू लागलो. अशातच बुधवारी आमच्या नानाचा फोन आला आणि त्याने त्याचा प्लान सांगितला आणि आमचे काहीही न ऐकता आमच्यासोबत चलायचे आहे असा सज्जड दम दिला. (वाचकांनी नानाचा “सज्जड दम” समजून घ्यावा). मग काय, “आले नानाचिया मना, तेथे कोणाचे काही चालेना” म्हणत आम्हाला आमचा प्लान बासनात बांधून ठेवण्यावाचून काहीही पर्याय उरला नव्हता. आम्ही ना-नुक्कड करत करत नानाला होकार कळवला आणि सगळी दिशाच बदलून गेली. जायचे कोठे असा प्रश्न केला असता त्याने सांगितले की “घोळ” गावी जावून बाकीचा घोळ घालायचा आहे.   





मागील वर्षी याच महिन्यात आमच्या काही धडाडीच्या ट्रेकर्सनी एकत्र येवून “इंडिया ट्रेक्स” नावाची नोंदणीकृत संस्था सुरु केली तिचा २२ जुलै २०१८ हा प्रथम वर्धापन दिन. ही संस्था ज्यांना भटकंतीची आवड आहे अशांना निसर्गभ्रमण करून आणणे आणि स्वर्गस्थ अनुभवाचा साक्षीदार बनवणे, एवढा मर्यादित उद्देश ठेवून स्थापन झालेली आहे. ४ माणसांपासून सुरुवात झालेली हि संस्था आज काही शे सदस्यांची झालेली दिसते. मागील वर्षाचा आलेख पाहता या संस्थेने केलेले सर्व भटकंतीचे कार्यक्रम संपूर्ण यशस्वी, विनासायास आणि अपघात विरहीत पार पाडलेले आहेत असे दिसते. आपल्या संस्थेस भरभरून शुभेच्छा, यशस्वी भव!!

रविवारच्या भल्या पहाटे कोंबड्याने बांग दिली अन जागा झालो. अरेच्या, आमच्या सिमेंटच्या जंगलात कोणी कोंबडा आणला असेल बरे, असा प्रश्नार्थक भाव माझ्या चेहऱ्यावर आला असेल तोवर लक्षात आले की हा खरोखरचा कोंबडा नसून माझा मोबाईल उर्फ भ्रमणध्वनी आहे आणि त्यात मी गजर लावला आहे, असो. आवराआवर केली आणि गाडी स्टार्ट करून तडक अभिरुची मॉल गाठला, वाटेत डॉक्टर साहेबांची विचारपूस केली की ते कुठवर पोहोचलेत म्हणून. आता आतुरता लागली होती ती इतर भिडूंच्या येण्याची, तोवर काय करायचे तर चहा घ्यायचा, शिरा-पोहे खायचे हा कार्यक्रम सुरु ठेवला. आजच्या ट्रेकला काही नवीन चेहरे दिसणार होते, पैकी एक डॉ. आकृती ज्या शिरवळहून आलेल्या आणि डॉ. गौरी पुण्यातून येणार होती. नेहमीप्रमाणे बस आली तीही अर्धा-अधिक तास उशिराने. लगोलग बसमध्ये शिरलो आणि सामान ठेवून दिले. सर्वांचे नमस्कार घेतले आणि बाकड्यावर बूड टेकवले, तत्पूर्वी माझ्या प्रिय मित्राची म्हणजेच नानाची आवर्जून गळाभेट घेतली आणि त्यास कानात सांगितले “तयार राहा”. गाडी “घोळ” गावाकडे मार्गस्थ झाली आणि मी कॅमेरा घेतला, सर्वांचे फोटो घेतले, आयुष्यात शेवटी आठवणी राहतात. पुण्यापासून थोडं अंतर गेल्यावर गाडी एका हॉटेलवर थांबली, तिथं सर्वांनी सकाळची
Faces after Breakfast
न्याहारी म्हणजेच नाश्ता उरकून घेतला आणि गाडीने पुन्हा वेग धारण केला.

      




गाडीने एकेक गाव, वाडी-वस्ती मागे टाकायला सुरवात केली आणि आम्ही गाडीत अंताक्षरी, गावा-शहरांच्या नावाच्या भेंड्या खेळायला घेतल्या. नानाने सर्वांच्या आग्रहाखातर “क्रांतिवीर” सिनेमामधल्या नाना पाटेकरचा संवाद “कलमवाली बाई क्रांती लाना चाहती थी” सादर केला आणि एकच हशा पिकला. पृथ्वीतलावर अस्तित्वात नसलेल्या गावांची नावे ऐकावयास मिळाली, जसे की खालच्या अंगाची वाडी, वरच्या अंगाची वाडी आणि मधल्या अंगाची वाडी राहील ती कशी. आजच्या ट्रेकचे आकर्षण म्हणजे छोटी परी “सिया”चा उत्साह अगदी वाखाणण्याजोगा,
तिच्या निरागसतेने सर्वांना “लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा” या उक्तीची आठवण करून दिली. मी तिचा एकच प्रश्न उभ्या आयुष्यात कधी विसरणार नाही असा, “अभिजीत काका, अजून किती वेळ?”, माझ एकच उत्तर “दोन मिनिटे! जे आमच्या नानाच्या घड्याळातले. दर दोन मिनिटांनी तिने हा प्रश्न विचारून अक्षरश: मला भंडावून सोडले, ती दोन मिनिटे संपायला तब्बल दोन तास लागले हे वेगळ सांगायला नको. का कोणास ठाऊक, आमच्या नानाचे आणि जीपीएस यंत्रणेचे हाडवैर, गाडी कधीच एकमार्गी चालत नाही, किमान दोनदा तरी रस्ता चुकावा आणि लोकांना विचारत परत तिने मुख्य रस्त्यावर यावे आणि पुढे जावे. पानशेत धरणाच्या मुख्य भिंतीपासून डाव्या बाजूने गाडीने डावीकडे वळण घेतले आणि घाटरस्ता आरंभला. उत्कंठा शिगेला पोहोचली होती, पावसाची संततधार सुरूच होती. वाटेत छोटे-छोटे ओढे-नाले पावसाच्या पाण्याने भरून वाहू लागले होते, फेसाळणारे छोटेखानी धबधबे मनातील उत्साह जोमाने वाढवत होते. वाटेतील गावांतील शेतकरी भाताच्या खाचरांमध्ये भात लागवड करत आमच्या गाडीकडे कुतुहलाने पाहत उभे राहायचे आणि आम्हाला हात वर करून दाद द्यायचे. त्यांना काय माहित की ते स्वर्गात राहतात आणि आम्ही सिमेंटच्या जंगलात! तब्बल तीन तासांच्या प्रवासानंतर आमची गाडी घाटरस्ते, चढ-उतार, ओढे-नाले पार करत धुक्याची दुलई पांघरलेल्या “घोळ” गावी पोहोचली.

वेळ न दवडता आवराआवर केली आणि सगळे एकत्र एका शेडमध्ये जमलो. ओळख परेड उरकून चालायला सुरुवात केली. शिर्षकाप्रमाणे आजूबाजूचा परिसर स्वर्गाहूनही सुंदर दिसत होता (स्वर्ग मुळी पाहिलाच कुणी, आमचा स्वर्ग म्हणजे सह्याद्री).

 पावसाची रिमझिम अविरत होती. आजूबाजूची कोकणदिवा पर्वतरांग धुक्याच्या दुलईमध्ये झाकोळून गेलेली दिसत होती. फेसाळणारे अनेक छोटे-मोठे पाण्याचे प्रवाह ह्या सुंदरतेमध्ये भर घालत होते, पुढे येवून ते आक्राळ-विक्राळ धबधब्यांमध्ये परावर्तीत होत होते. एकूणच काय आजची सफर स्वर्गस्थ होणार होती. या अद्भुत आणि निसर्गाची मुक्तहस्ते उधळण झालेल्या प्रदेशाची सफर घडवून आणण्यासाठी
हरिश्चंद्र काका आमचे वाटाडी म्हणून येणार होते. काकांचे वय साधारण साठी पार केलेले, चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या, सडपातळ बांधा आणि शिडशिडीत शरीरयष्टी, बोळक्यातील पुढचे तीन दात अधूनमधून लुकलुकत होते, उत्साह आणि उर्जा मात्र प्रचंड, अगदी आम्हा तरुणांना लाजवेल अशी.


गावापासून अलीकडे आल्यावर एक गाडीवाट उजव्या बाजूला वळते ती आपणास “गारजाईवाडी”

कडे घेवून जाते. वाटेवरून चालताना फोटोत पाहिलेल्या धबधब्याची ओढ मनात कायम होती, कधी एकदाचा तो दिसतोय आणि त्यात जातोय असं झालं होतं, आणि एकदाचा तो नजरेस पडला, त्याला पाहिलं, त्यान जिंकल. कोणाची वाट न पाहता मी धबधब्यात शिरलो, जवळ जाता येत नव्हत कारण पाण्याचा प्रवाह साधारण १०० फुट उंचीवरून दोन टप्प्यांमध्ये जमिनीवर कोसळत होता. जवळच्या एका खडकावर उभे राहून त्यास मी माझ्या गोप्रो कॅमेऱ्यात कैद करून घेतला, आता मनसोक्त डुंबण्याची वेळ होती. डॉक्टर साहेब आले, पाठोपाठ जाधव दांपत्य आले, डॉ. गौरी आणि इतर काहीजणांनी स्वत:ला फेसाळणाऱ्या गार-गार पाण्यात झोकून दिले.
काहींना तर त्यांचे मोबाईल फोन पूर्ण भिजून बाहेर आल्यावर कळले की ते खिशातच होते म्हणून, बिच्चारे मोबाईल आणि त्यांचे मालक. सर्वांना बाहेर काढता काढता ट्रेक लीडरची दमछाक झाली. सगळे बाहेर आल्यानंतर पुढची चाल सुरु ठेवली. आता थोडं पोटाला काम देणं गरजेचं होतं म्हणून मला मिळालेली उकडलेली अंडी बाहेर काढली. अचानक आतापर्यंत न दिसलेला नाना कुठून प्रकटला आणि त्याने अधाशासारखं माझ्याकडच एक अंड हिसकावून घेवून फस्त केलं, बर राहिलेलं दुसरं अंड तरी मला पूर्ण खाता येईल, त्यातही डॉक्टर साहेबांनी हक्क सांगितला. तीच गत फ्रुटीची, मला दिसल्यासारखी झाली पण आस्वाद काही घेता आला नाही. वातावरण इतकं आल्हाददायक होतं की शब्दात वर्णन करणे कठीणच, “शब्द बापुडे केवळ वारा, तोही सह्याद्रीचा” असे. अनुभव घेतल्याशिवाय कळणार नाही असा!.

एक-दीड किलोमीटर चालल्यानंतर गारजाईवाडी आली, वाटेत तब्बल चार ठिकाणी फेसाळणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात सर्वांनी स्वता:ला झोकून दिले, नव्याने सांगण्याची काहीही आवश्यकता नाही. 



चारपाच घरांची ही वाडी, गवताने शेकरलेली प्रशस्त घरे, शेणाने सारवलेली अंगणे, त्यासमोर छोटीशी तुळशी वृंदावने आणि त्या घरांमधला आपलेपणा अजूनही आहे तसाच. एका घरासमोरून जाताना अवचितपणे आजीबाईंचा आवाज कानात घुमला, कोण गावचे म्हणे पोरानो? त्या आवाजातला आपलेपणा, निरपेक्ष भाव मला माझ्या आजीच्या आवाजाची आठवण करून देत होता. पुण्याचे म्हणून मी सांगितले तोवर आजीनी त्याच मायेने ठणकावून सांगितले, घ्या भिजून, आपलच आहे हे सगळं!! आजीबाईंचा तो निखळ आनंदी चेहरा मनात साठवला आणि पुढची वाट चोखाळली. गावाकडच्या लोकांनी आपलं समृद्ध गावपण आणि संस्कृती आजही जतन करून ठेवल्याचे ते द्योतक म्हणावे. आजींचा निरोप घेवून गाडीवाट सोडली आणि जंगलाची वाट धरली, आता एक तासाची मध्यम श्रेणीची चढाई पार करून “आंब्याचा दांड” पठारावर पोहोचायची उत्सुकता लागली होती.

 

 
 

इथून पुढची वाट मध्यम दाट जंगलातून जाणार होती. विविध प्रकारची झाडे-झुडपे त्यात काही काटेरी तर काही बिन काट्याची, फुलांचा बहर अजून येणे बाकी असलेने एकही झाडावर फूल नव्हतेच. जंगली कीटक आणि मच्छरांची भरमार, परिसरातले कीटक फारच चावरे होते, त्यांचे चावणे म्हणजे त्रासदायकचं हो. प्रत्येक ट्रेकरला त्या चाव्याचा अनुभव आला असेलच. नागमोडी वाट अगदी सुरुवातीस सोपी वाटणारी थोडीशी अवघड होत गेली. साधारण ७० अंश कोणातील वाट चालताना नवख्या ट्रेकर्सना दम लागत होता, मुख्य म्हणजे आता वाट घसरगुंडी झाली होती, आणि काहींना त्याचा प्रसाद भेटण्यास सुरुवात झाली होती. त्यांना कुठे माहित होतं की अजून उताराची तालीम बाकी होती म्हणून. चढाईच्या मधल्या टप्प्यावर पोहोचून सर्वांनी एक छोटासा विसावा घेतला आणि दरम्यान फोटो सेशन करून घेतले, पावसाने थोड्या वेळासाठी उघडीप दिली होती.
विसावा संपवून परत चाल सुरु ठेवली आणि हलकेच लक्षात आले की माझ्या झोळीत पुण्याच्या चितळ्यांची बाकरवडी आहे म्हणून, झोळी चालताचालता पुढ्यात घेतली आणि बाकरवडीची पिशवी बाहेर काढली. काही कळायच्या आत पिशवीने तळ गाठला, अगदी गरजेच्या वेळी बाकरवडी खाल्ल्याने पोटास थोडे हायसे वाटले. जंगलातील वाट एव्हाना संपवून आम्ही चढाईच्या शेवटच्या टप्प्यात आलो होतो, पाठीमागे पाहिले असता धुक्याच्या चादरीत लपलेली वाडी दिसली. एव्हाना बाकरवडी पोटाच्या कोणत्या कोपऱ्यात हरवली होती कोण जाणे, आता भुकेचे डोहाळे लागले होते. नानाच्या पाठीवर एका मोठ्या डब्ब्यामध्ये विसावलेल्या चिकनचा वास भूकेचा जोर वाढवत होता. संपूर्ण चढाईस अर्धा ते एक तास लागला आणि सर्वजण “आंब्याचा दांड” पठारावर येवून पोहोचलो.
Happy faces at Summit! 
ग्रुप फोटो सेशन झाले आणि पुढची वाट धरली. आंब्याचा दांड पठार अवघ्या एक वर्ग किमी क्षेत्रफळाच्या आकाराचे जे धांड खडकाला जोडते. धांड खडकावर पोहोचल्यावर विना विलंब डबा उघडला आणि चिकन रस्सा आणि चपातीवर आडवा हात साफ केला. आता वेळ होती “वर्धापन दिन” समारंभाची. डॉक्टर साहेब, नाना आणि हरिश्चंद्र काका यांनी केक कापला, एकमेकांस भरवला, आम्हीही खाल्ला. डॉक्टर साहेबांनी समारोपाचे छोटेखानी मार्गदर्शन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, जल्लोष साजरा केला आणि “कोळ्याच्या नाळे” कडे प्रस्थान ठेवले.

इतकं छान जेवण झाल्यावर शरीरात आळस नाही संचारणार ते कसं, आता अगदीच जास्त माही तर २० मिनिटांची पडी आवश्यक होती परंतू वेळ फार दवडून चालणार नव्हता म्हणून मनोमन निसर्गाचे आभार मानले अन चालायला सुरुवात केली. मध्यम श्रेणीची चढाई आता तीव्र स्वरूपाचा उतार धारण करणार होती हे कसलेल्या ट्रेकर्सना फक्त माहित होतं, पुढे हरिश्चंद्र काका आणि मागे आमचा लवाजमा पाच पंचवीस पावले चालला असेल तोवर काका कारवीच्या गर्द झाडीत दिसेनासे झाले, मागाहून चालणारा एकेकजण त्या गर्द झाडीत लुप्त होत होता. एक माणूस हळूहळू तेही कमरेत वाकून चालू शकेल एवढी ती वाट, आता मात्र इथं वाटाड्या किती आवश्यक आहे याची जाणीव झाली, एकतर वाट सापडणे मुश्कील आणि सापडलीच तर ती जंगलात चुकवणार हे मात्र त्रिकालबाधित सत्य. कारवीची एकेक फांदी बाजूला सरकवत पुढे चालत राहिलो, एक वेळ असं वाटलं की आपण विरुद्ध बाजूला जात आहोत आणि काहीतरी चुकतय असं! पण तसेच चालत राहिलो, अंदाजे अर्धा किलोमीटरची ही वाट कारवीच्या घनदाट जंगलातून जाते, वाटेत तीन चार ठिकाणी पाण्याचे ओहोळ लागले, अधूनमधून पज्या आणि डॉक्टर कंपनीची जुगलबंदी चालूच होती. “बिकट वाट वहिवाट” या उक्तीप्रमाणे ही वाट “अखंड सावध असावे” हेही निक्षून सांगत होती. आणखीन थोडं अंतर पुढे गेल्यावर वाट डाव्या बाजूला वळली आणि उताराची वाटचाल सुरु झाली. आता मात्र ट्रेकिंग म्हणजे काय असत ते नवख्या ट्रेकर्सना कळणार होतं! ते कसं काय, तर ते सरसर घसरणार होते आणि धपाधप आपटणार होते आणि आपसूकपणे त्यांच्या पृष्ठभागावर सह्याद्री प्रसाद मिळणार होता आणि तोही अमर्यादित. जशी उताराला सुरुवात झाली आणि डॉ. गौरीने तिने पायात घातलेल्या महागड्या बुटांच्या दर्जाचे महात्म्य सपशेल माघारी घेतले, पुढचं काय ते वाचकांनी समजून घ्यावे. डॉक्टर साहेबांनी तर माझ्यावर आणि मी दिलेल्या भेटवस्तूवर अक्षरशः स्तुतीसुमनांचा जणू वर्षावच केला, किमान २० वेळा त्यांनी मी दिलेल्या भेटवस्तूचा उल्लेख केला असेल, असो. मी दिलेली भेटवस्तू डॉक्टर साहेबांना मनापासून आवडली होती, तेच माझं समाधान होतं. मजल दरमजल करत आमचा जत्था “काळ-आंबा” नदीच्या धारेपाशी येवून पोहोचला, येणेप्रमाणे सर्वजण “शुचिर्भूतम” झाले सगळे. ही तीच मुख्य धार होती जिस पुढे छोटे-मोठे ओहोळ येवून मिळत होते आणि आम्ही सकाळी न्हालेल्या धबधब्यात सर्व परावर्तीत होत होते. आता मात्र सायंकाळ झाल्याच्या खुणा दिसू लागल्या होत्या, वातावरण गडद होत होते आणि परतीची ओढ लागलेली होती. अर्धाधिक तास उताराची चाल संपवून आम्ही सपाट प्रदेशात परतलो, नजरेसमोर घोळ गाव दिसले आणि पुढ्यात डांबरी सडक, गप्पा-टप्पा टंगळमंगळ करत आमच्या बसपाशी पोहोचलो, विनाविलंब ओलेचिंब भिजलेले कपडे बदलून शिल्लक ठेवलेला पेहराव परिधान केला आणि बाकी सदस्यांची वाट बघत शेवटचे फोटो सेशन उरकून घेतले. सगळे सदस्य जमा झाल्याची खातरजमा केली आणि परतीचा प्रवास सुरु केला. इंडिया ट्रेक्सच्या प्रथम वर्धापन दिनाच्या आणि त्यानिमित्ताने झालेल्या आजच्या भन्नाट ट्रेकच्या आठवणी मनात साठवलेल्या आहेत आणि राहतील सुद्धा.

 





“ऑफबीट” प्रकारात मोडणारा, चढाई श्रेणी मध्यम आणि उताराची श्रेणी मध्यम ते जराशी अवघड असा आजचा ट्रेक एकंदरीत पन्नाशीच्या आतील सर्व आबालवृद्धांनी अवश्य करावा असा आहे. भरपूर सारे धबधबे, नद्या नाले, हिरवीगार वनराई, आखीव–रेखीव भाताची खाचरे आणि गावाकडच्या लोकांचा आपलेपणा नक्की अनुभवायास मिळेल असा. साधारण २५० लोकवस्ती असलेल घोळ गाव वेल्हे तालुक्यात स्थित असून घाटमाथ्यावरचे ते शेवटचे गाव आहे, इथून पुढे कोकणपट्टा सुरु होतो. इथं जाण्यासाठी आपणास खडकवासला, पानशेत धरण मार्गे जावे लागते, पानशेत धरणाच्या पुलापासून डावीकडे वळण घेत पुढे सरळ रस्ता, एकही डावे-उजवे वळण न घेता सरळ रस्त्याने अंदाजे ७० किमी अंतर कापून घोळ गावी पोहोचावे. या ट्रेकला जाताना किमान १० जणांचा घोळका तरी नक्की असावा, इथल्या वाटा मळलेल्या जरी असल्या तरी क्षणात चुकवणाऱ्या आहेत त्यामुळे वाटाड्या घेणे बंधनकारक राहील. जेवणाची व्यवस्था आपण स्वत: जाताना करून जावी, गाव छोटसं आणि मुख्य प्रवाहापासून दूर असलेने जेवणाची व्यवस्था होत नाही. सर्व सहभागी सदस्यांचा नामोल्लेख करत नाहीये, त्याबद्दल क्षमस्व, सर्वांचे मनापासून आभार. भेटूयात लवकरच... 

जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे”.


आपला,


श्री. अभिजीत शिंदे, पुणे.
+९१ ९५२७३३०५६७
इमेल – shinde.abhijeet83@gmail.com.